ग्रिफित्शिया अर्थात लाल शेवाळाची कथा; भाग – १

(मित्रहो माझी मराठीतली एक नवीन लघु कथा आजपासून इथे टाकत आहे.  अर्थात लघु म्हटली तरीही ही बऱ्यापैकी दीर्घ आहे, त्यामुळे ती पाच भागांमध्ये विभागून टाकत आहे.  कथा आवडली, नाही आवडली किंवा तुमचा जो काय अभिप्राय असेल तो जरुर सांगा.  आणखी एक म्हणजे, मला मराठी टंकलेखनाची फारशी सवय नसल्यामुळे (आणि सध्या बाहेरून काम करुन घेता येत नसल्यामुळे), यात शुद्धलेखनाच्या काही चुका राहिल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही.  त्याबद्दल आधीच क्षमस्व.

आता नेहेमीच्या चालीरीती प्रमाणेच आणखी एक घोषणा करून टाकतो. ही कथा संपूर्णपणे स्वतंत्र आणि फक्त कल्पनाविष्काराने लिहिलेली आहे. यातील सर्व पात्रं, प्रसंग आणि जागा या काल्पनिकच आहेत आणि वास्तवाचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही… वगैरे वगैरे…

तर एक आटपाट नगर होतं आणि तिथे एक राजा राज्य करत होता…)

 

ग्रिफित्शिया अर्थात लाल शेवाळाची कथा

भाग – १

जागतिक स्वास्थ संघटनेच्या जिनिव्हामधील मुख्य कार्यालयात डॉ लक्ष्मी स्वामिनाथन टेलिकॉन्फरन्स रूम मधे बसल्या होत्या. त्यांच्या समोरच्या भिंतीवर वरती वेगवेगळ्या देशांमधल्या वेळा दाखवणारी घड्याळं लावलेली होती.  त्यात मध्यभागी होतं ग्रीनिच मीन टाईम दाखवणारं घड्याळ.  बरोबर त्या घड्याळाखाली मोठ्ठ्या स्क्रीनचा एक टीव्ही चालू होता आणि त्यात वेगवेगळ्या खिडक्यांमध्ये वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधी आलेले दिसत होते.

“सभासद मित्रहो”, ग्रीनिच मीन टाईम दाखवणाऱ्या घड्याळात बरोबर दहा वाजले आणि डॉ लक्ष्मीनं तिच्या समोरच्या मायक्रोफोनमध्ये बोलायला सुरूवात केली.  समोरच्या टीव्ही स्क्रीनवर आता डॉ लक्ष्मीचाच चेहेरा दिसत होता.   “गुड मॉर्निंग.  सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं जागतिक आरोग्य संस्थेच्या या टेलिकॉन्फरन्स मध्ये स्वागत. या परिषदेत आपल्याला कुठल्या विषयावर चर्चा करायचीआहे हे तुम्हाला कळवलेलंच होतं आणि तुम्ही सगळे त्याप्रमाणे तयारीही करून आला असाल आणि तुमच्या सगळ्यांची प्रेझेंटेशन्स सुद्धा तयार असतील.  तुमच्यापैकी बरेच जण मला ओळखता.  पण ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी मी माझी थोडक्यात ओळख करून देते आणि मग या टेलिकॉन्फरन्सचा उद्देशही परत एकदा सांगते.   माझं नाव डॉक्टर लक्ष्मी स्वामिनाथन.  मी जागतिक आरोग्य संघटनेत मागची सुमारे पाच वर्षं काम करते आहे.  मी सुरुवातीला इथे उपमहासंचालक म्हणून काम करत होते आणि मागची दोन वर्षं आता जागतिक आरोग्य संघटनेची मुख्य शास्त्रज्ञ म्हणून मी जबाबदारी सांभाळते.”

एक क्षणभर थांबून डॉ लक्ष्मीनं पुन्हा पुढं बोलायला सुरुवात केली.  ” आज ३० जून २०२०. जगाच्या इतिहासातल्या एका कदाचित सगळ्यात मोठ्या संकटाशी आपण सगळे सामना करतोय.  करोनाव्हायरसनं संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात ओढून घेतलंय.  काल संध्याकाळपर्यंत या संसर्गानं पाच लाखांच्यावर लोक मृत्यूमुखी पडले आहेत आणि शिवाय पन्नास लाख लोकांना याची लागण झालीये.  आपण प्रत्येक जण शास्त्रज्ञ, संशोधक किंवा वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात आहात आणि आपापल्या देशात या रोगावर निदान शोधण्याच्या शोधकार्यात गुंतलेले आहात.  जागतिक आरोग्य संघटनेला आणि पर्यायानं संपूर्ण जगालाच आपल्या या संशोधनांची पूर्ण माहिती हवी आहे, आणि म्हणून आपण आज सगळे इथे या टेलिकॉन्फरन्स मध्ये सहभागी झालो आहोत.  कोव्हिडच्या उपचार पद्धतीवर आपल्या देशात काय संशोधन चाललं आहे, ते आत्ता कुठल्या स्तरावर आहे, सर्वसामान्य जनतेसाठी आपली उपचार पद्धती कधीपासून वापरात आणता येईल या विषयावर प्रत्येक देशानं आपापलं प्रेझेंटेशन सादर करायचं आहे.  त्यातून सगळ्याच देशांना कोव्हिडच्या विरोधातली लढाई कुठल्या दिशेनं चाललीये आणि त्याच्यावर आपण कधी विजय मिळवू शकू याचा अंदाज येईल.” टेलिकॉन्फरन्स मधले सगळेच सदस्य गंभीरपणे डॉ लक्ष्मीचं बोलणं ऐकत होते.

“याशिवाय या कॉन्फरन्स चा आणखी एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे तुमच्या संशोधन कार्यात तुम्हाला एखाद्या विशिष्ट देशाकडून किंवा जागतिक समुदायाकडून किंवा संयुक्त राष्ट्रसंघाकडून जर काही मदत हवी असेल तर ही परिषद तुम्हाला योग्य ती सर्व मदत मिळवून देईल.  ही लढाई कुठल्याही एका देशाची नसून जागतिक आहे.  त्यामुळे या लढाईला आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित पणे तोंड देणं आवश्यक आहे.  संपूर्ण जग या टेलिकॉन्फरन्स कडे मोठ्या आशेनं बघतं आहे”.

डॉ लक्ष्मीनं आपली प्रस्तावना पूर्ण केली आणि ती मुख्य विषयाकडे वळली.  “आपण आता आपापल्या प्रेझेंटेशन्सना सुरुवात करुया.  संपूर्ण जगात करोनाव्हायरसच्या जवळ जवळ १५० वेगवेगळ्या उपचार पद्धतींवर संशोधन चालू आहे.  या सर्व दीडशे उपचार पद्धतींवरची प्रेझेंटेशन्स पाहणं आपल्याला सीमित वेळेमुळे शक्य नाही.  त्यामुळे, आपण यातल्या सर्वात जास्त आशादायक आणि सर्वात जास्त लवकर उपलब्ध होऊ शकणाऱ्या उपचार पद्धतींबद्दलची प्रेझेंटेशन्स इथे बघू आणि त्यावर साधक बाधक चर्चा करून पुढची वाटचाल ठरवू.  आपण आता पहिल्या प्रेझेंटेशन कडे वळू.  मी अमेरिकेचे प्रतिनिधी डॉ ब्रायन मॅककार्थींना त्यांच्या देशातल्या प्रयोगांबद्दल सगळ्यांना माहिती देण्याची विनंती करते. ”

टीव्हीच्या मोठ्या स्क्रीनवर डॉ मॅककार्थींचा चेहेरा झळकला.  डॉ मॅककार्थी अमेरिकेतल्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेचे संचालक होते आणि अमेरिकेच्या कोव्हिड विरोधी राष्ट्रीय कृती दलाचे सदस्यही होते.  त्यांचा स्वत: चा संसर्गजन्य रोगांवरचा अभ्यास दांडगा आणि जगन्मान्य होता.

“प्रथम तुमच्या सगळ्यांचं या परिषदेत स्वागत. ” डॉ मॅककार्थींनी गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली. “अतिशय वाईट परिस्थितीत या परिषदेला आपण सगळे आलो आहोत.  मी तर अशा देशातून आलोय, ज्याला करोना व्हायरसच्या या संसर्गाची सगळ्यात मोठी झळ बसली आहे.  संसर्ग आणि मृत्यू या दोन्हींनीआमच्या देशात थैमान घातलंय.  अशी परिस्थिती असतानाही करोना व्हायरसच्या उपचार पद्धतींवर आणि लसींवर जगात सगळ्यात जास्त संशोधन आमच्याच देशात चालू आहे. अमेरिकेतली जवळ जवळ प्रत्येक मोठी औषध कंपनी आणि प्रत्येक विद्यापीठ या विषयात संशोधन करतंय. कदाचित मानवते बद्दलच्या या उदात्त वृत्तींमुळेच अमेरिकेनं जगाला सगळ्यात जास्त नोबेल पारितोषिक विजेते दिले आहेत.  आणि म्हणूनच अमेरिका जगातली सगळ्यात मोठी महासत्ता आहे”.  डॉ मॅककार्थींच्या चेहेऱ्यावर एक प्रकारच्या अहंमन्यतेचा भाव पसरला होता.

“आता मी माझ्या मुख्य प्रेझेंटेशनकडे वळतो.  आधी म्हटल्याप्रमाणे, अमेरिकेतली जवळ जवळ प्रत्येक मोठी औषध कंपनी आणि प्रत्येक विद्यापीठ या विषयात संशोधन करतंय.  पण आमच्या सगळ्या संशोधकांची संशोधनाची दिशा साधारणपणे एक सारखीच आहे.  म्हणजे आम्हा सगळ्यांचं एका गोष्टीवर ठाम एकमत आहे की हा विषाणू स्वतःच स्वतःच्या जीवावर जिवंत राहू शकत नाही.  याला याला मानवी जनुकांची आणि मानवी शरीरातल्या प्रथिनांची गरज असते.  हा यांच्यावरच बांडगूळासारखा राहतो आणि वृद्धिंगत होतो.  मग या विषाणूला लक्ष करण्यापेक्षा आम्ही, या विषाणूतला आणि या जनुकांमधला किंवा प्रथिनांमधला दुवा तोडण्यावर किंवा असा दुवा तयारच होऊ न देण्यावर भर   दिला आहे. आमची उपचार योजना तशा तत्त्वावर आधारलेली आहे.”

डॉ मॅककार्थींनी यानंतर त्यांच्या प्रेझेंटेशनची एक एक स्लाईड परिषदेला दाखवायाला सुरुवात केली. यात कोणत्या विद्यापीठात किंवा कोणत्या कंपनीत काय संशोधन चाललंय, यात कुठल्या प्रकारची उपचार पद्धती तयार होतीये आणि आज हे संशोधन कुठल्या स्तरावर आहे, अशी सारी विस्तृत माहिती होती.  परिषदेतले सभासद यावर आपल्या शंका विचारत होते आणि डॉ मॅककार्थी या सगळ्यांना विस्तारानं उत्तरं देत होते.  जवळ जवळ दोन तास अमेरिकेचं प्रेझेंटेशन चालू होतं.

मित्रहो, तुम्ही सगळ्यांनी बघितल्याप्रमाणे आमचा देश या संशोधनात खूप पुढे गेलाय.  जर प्रयोग शाळेतल्या चाचण्या  आणि क्लिनिकल चाचण्या सगळ्या व्यवस्थित पार पडल्या आणि त्यांचे निष्कर्ष आम्हाला अपेक्षित असे सकारात्मक आले तर कदाचित पुढच्या दोन अडीच महिन्यात आम्ही करोना व्हायरससाठी पहिलं औषध जगाला देऊ शकू.  या शिवायही आपल्याला आमच्या संशोधनांबद्दल काही शंका असतील किंवा जास्त माहिती हवी असेल तर मला मेल लिहा किंवा फोन केलात तरीही चालेल.” इतकं सांगून डॉ मॅककार्थींनी त्यांचं प्रेझेंटेशन संपवलं.

सगळ्या सभासदांनी टाळ्या वाजवून प्रेझेंटेशन आवडल्याची पावती दिली.

परिषदेच्या दुपारच्या सत्रात इंग्लंड आणि नेदरलँडसची प्रेझेंटेशन्स झाली.  इंग्लंडचं प्रेझेंटेशन प्राध्यापक ह्यूगो विलियम्सनी केलं.  “इंग्लंड मधल्या ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि या विद्यापीठाची जेनर इन्स्टिट्यूट या दोघांच्या संयुक्त प्रयत्नातून इंग्लंडचं मुख्य संशोधन चालू आहे.  याशिवाय इंपिरिअल कॉलेज लंडनचं पण करोना व्हायरसच्या उपचारासंबंधी विस्तृत संशोधन चालू आहे.  त्याचप्रमाणे इंग्लंड सरकार एच आय व्ही आणि मलेरिआ बरा करू शकणाऱ्या औषधांच्या आणि विशिष्ठ प्रकारच्या स्टेरॉईडसच्या खूप मोठ्या प्रमाणात चाचण्या करत आहे”, असं प्राध्यापक विलियम्सनि सांगितलं आणि या सगळ्या प्रयत्नांबद्दलची सविस्तर माहिती सदस्यांना दिली.  या सगळ्या शक्य उपाय योजनांवर सदस्यांनी बऱ्याच शंका विचारल्या आणि प्राध्यापक साहेबांनी सगळया प्रश्नांची समर्पक उत्तरं दिली.

नेदरलँडसच्या प्रेझेंटेशनमधे इरासमस मेडिकल सेंटर आणि उतरेख्त विद्यापीठाच्या संयुक्त प्रयत्नातून या पूर्वीच्या सार्स आणि मर्स संसर्गांच्या वेळेस रक्तातल्या अँटीबॉडीज तयार केल्या गेल्या होत्या, त्याबद्दल सांगितलं गेलं.  त्याच अँटीबॉडीजच्या पायावर आता पुन्हा एकदा करोना व्हायरस साठी अँटीबॉडीज तयार करण्याचं काम सुरू होतं. यावेळेस हे सगळं संशोधन इरासमस मेडिकल सेंटर, उतरेख्त विद्यापीठ आणि मास्टरिश विद्यापीठ या सगळ्यांच्या सहकार्यातून चालू होतं.  मास्टरिश विद्यापीठाच्या डॉक्टर पीटर पीटर्सनी त्यांच्या प्रेझेंटेशन मध्ये ही सगळी माहिती उलगडून सांगितली.  नेदरलँडस मधल्या जवळ जवळ प्रत्येक वैद्यकीय कॉलेजमधे आणि जवळ जवळ प्रत्येक विद्यापीठात कोव्हिड बद्दल संशोधन चालू आहे, असं डॉक्टर पीटर्सनी त्यांच्या भाषणात सांगितलं.  या सगळ्या प्रयत्नांची माहिती त्यांनी सदस्यांना दिली.

इंग्लंड आणि नेदरलँडसची ही दोन्ही प्रेझेंटेशन्स सुद्धा माहितीपूर्ण होती. या दोन्ही प्रेझेंटेशनमध्येच दुपारचं सत्र पूर्ण झालं.

“आज आपण तीन प्रेझेंटेशन्स बघितली आणि तीनही अतिशय माहितीपूर्ण होती.” डॉक्टर पीटर्सचं प्रेझेंटेशन संपताच डॉक्टर लक्ष्मी पुन्हा एकदा स्क्रीनवर आल्या. “या तीनही प्रेझेंटेशन्समुळे आपल्याला सगळ्यांनाही थोडासा हुरूप आला असेल. अमेरिका, युके आणि नेदरलँडसच्या प्रतिनिधिंचे मी माहितीपूर्ण प्रेझेंटेशनसाठी आभार मानते.  संपूर्ण जगाला तुमच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत.”  एक सेकंद थांबून डॉक्टर लक्ष्मीनं एकदा डायरीवरनं नजर फिरवली आणि लगेच पुन्हा पुढे बोलायला सुरुवात केली.  “आपल्या परिषदेचं आजच्या दिवसाचं काम आपण आता इथे थांबवत आहोत.  उद्या सकाळी पुन्हा आजच्याच वेळेला आपण सुरुवात करु.  उद्या सकाळी पहिलं प्रेझेंटेशन चीनचं आहे आणि मला वाटतं हे सगळ्यात महत्त्वाचं प्रेझेंटेशन असेल कारण करोना व्हायरसवर चीनी संशोधकांनी खूप अभ्यास केलाय आणि उद्याच्या प्रेझेंटेशनद्वारे जागतिक समुदायांसमोर काही मागण्या त्यांना मागायच्या आहेत असं त्यांनी सांगितलंय.  त्याच प्रमाणे कोव्हीड उपचारांबद्दलही काही निश्चित निष्कर्ष निघालेल्या गोष्टी त्यांना आपल्या पुढे ठेवायच्या आहेत.  त्यामुळे उद्याचा दिवस महत्त्वाचा असेल असं वाटतंय.  धन्यवाद.  उद्या भेटू.”

***

संध्याकाळी आठ साडेआठ ची वेळ असेल.  तिन्हीसांजा उलटून जाऊन अंधार पडला होता.  भूतानच्या मुख्य बुद्ध मठातलं वातावरण अतिशय शांत गंभीर होतं. ध्यानासाठी मुद्दाम तयार केलेल्या प्रचंड मोठ्या हॉलमध्ये मंद दिवे तेवत होते.  उदबत्तीचा दरवळ हॉलभर हलकाच पसरला होता. समोरच्या बाजूला असलेल्या बुद्धाच्या मोठ्या मूर्तीच्या चेहेऱ्यावर नेहेमीप्रमाणेच गहन स्मित पसरलेलं होतं.  भूतानचे राजे जिग्मे खेसर नाम्ग्येल वांगचुक, भूतानचे मुख्य धर्म प्रवर्तक, हिज होलीनेस जे खेन्पोंच्या समोर होते.   दोघंही डोळे बंद करून ध्यानमग्न बसले होते.

“ओम मणिपद्मे हं… ओम मणिपद्मे हं… ” जे खेन्पोंनी धीर- गंभीर स्वरात मंत्रोच्चार केला.  “राजन, ओम मणिपद्मे हं हा शडाक्षरी मंत्रच भूतानचं रक्षण करील.  आपल्या सगळ्या जनतेला ध्यान धारणेवर भर द्यायला सांगा.  ओम मणिपद्मे हं चा अर्थ मनोमन समजून घेऊन, निरासक्तीनं त्याचं आचरण करायला जनतेला सांगा.  मानवतेसाठी तोच योग्य मार्ग आहे. ”

राजे वांगचुकांनी डोळे उघडले आणि वाकून जे खेन्पोंना आणि बुद्धाच्या मूर्तीला नमस्कार केला. राजांना मनाला नवीन उभारी मिळाल्यासारखं वाटत होतं.

  • क्रमश:

मिलिंद जोशी

9930904824

cropped-blue-life-site-icon.png

5 thoughts on “ग्रिफित्शिया अर्थात लाल शेवाळाची कथा; भाग – १

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s