ग्रिफित्शिया अर्थात लाल शेवाळाची कथा; भाग – २

बरोबर सकाळी दहा वाजता टेलिकॉन्फरन्स पुन्हा सुरू झाली.  सगळे सभासद टीव्हीच्या पडद्यावर हजर झालेलेच होते.

“गुड मॉर्निंग. ” सुरूवात कालच्या प्रमाणेच आजही डॉ लक्ष्मींनीच केली.  “आपल्या परिषदेत तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.  आज आपण सकाळच्या सत्रात चीनचं प्रेझेंटेशन बघणार आहोत.  त्यानंतर दुपारच्या सत्रात जर्मनी आणि इस्राएल यांची प्रेझेंटेशन्स आहेत.  मी काल म्हटल्याप्रमाणे चीनला या परिषदेद्वारा जागतिक समुदायां समोर काही मागण्या मांडायच्या आहेत आणि त्यावर चर्चाही करायची आहे.  चीनकडून त्यांचे प्रतिनिधी डॉक्टर जियांग शिझेन या परिषदेत सहभागी झालेले आहेत.  डॉ शिझेन साथीच्या रोगांमधले जगातले एक सुप्रसिद्ध संशोधक तर आहेतच, शिवाय चीनच्या सैनिकी वैद्यकीय विद्यापीठाचे ते बरेच वर्षं अध्यक्षही आहेत.  त्यामुळेच त्यांच्या डॉक्टर या पदवी बरोबरच ते एक मेजर जनरल सुद्धा आहेत.  डॉक्टर शिझेन यांना आता विनंती करते की त्यांनी त्यांचं प्रेझेंटेशन आपल्या समोर मांडावं.  धन्यवाद.”  डॉ लक्ष्मी स्क्रीन वरून बाजूला झाल्या आणि चीनचे प्रतिनिधी डॉक्टर जियांग शिझेनांचा चेहेरा स्क्रीनवर दिसायला लागला.

वयस्कर डॉक्टर शिझेन. बारिक पण वेधक चमकणारे डोळे. त्यावर सोनेरी काड्यांचा चश्मा आणि चेहेऱ्यावर अतिशय चाणाक्ष बुद्धीमत्तेची झाक.  त्यांच्या बारिक आवाजात त्यांनी बोलायला सुरुवात केली.

“मित्रहो, नमस्कार. आपल्या सगळ्यांचं या परिषदेत चीनतर्फे मी स्वागत करतो. ज्या करोना व्हायरसनं आज जगात उच्छाद मांडलाय त्याचा सर्वात पहिला फटका त्यानं आम्हाला दिला.  मागच्या वर्षीच्या डिसेंबरमध्येच त्यानं त्याचं अस्तित्व दाखवून दिलं.  हा व्हायरस कुठून आला, कसा आला या गोष्टीवर मी आता काही बोलणार नाहीये, कारण त्या सगळ्या बोलण्याला आता काही फारसा अर्थ नाहीये.  यावर तातडीनं उपचार पद्धती शोधून काढणं आणि ती सर्व सामान्य लोकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवणं हे आज आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. ” डॉक्टर शिझेनच्या दोन दोन तीन तीन शब्द तुटकपणे बोलण्याच्या सवयी मुळे बाकीच्या सदस्यांना त्यांचं बोलंणं नीट कान देऊन ऐकायला लागत होतं.

“या व्हायरसचं अस्तित्व लक्षात आल्या दिवशी पासूनच चीनी संशोधकांनी आणि वैद्यकीय तज्ञांनी याच्यावर संशोधन करायला सुरुवात केली.  जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात आम्ही या व्हायरसची संपूर्ण तांत्रिक माहिती जागतिक आरोग्य संघटनेला दिली आणि इतर ज्या ज्या देशांनी ही माहिती मागितली त्या त्या देशांनाही ती पुरवली.  सांगायचा उद्देश हा की आमचं या क्षेत्रातलं संशोधन तुमच्या सगळ्यांच्या बरंच आधीच चालू झालं होतं. दुसरं म्हणजे या    संशोधनातले पहिले काही धडे आम्ही तुम्हाला शिकवले होते त्यामुळे तुमचा वेळ आणि पैसाही बराच वाचला होता. तिसरी गोष्ट म्हणजे चीन तंत्रज्ञानाच्या बाबतीत जगातला सगळ्यात पुढारलेल्या देशांपैकी एक आहे.  या सगळ्या मूलभूत घटकांमुळे आम्ही या क्षेत्रातल्या संशोधनात तुम्हा सगळ्यांपेक्षा खूप पुढे आहोत. आणि खूप पुढे म्हणजे असं की आज आमची स्थिती अशी आहे की करोना व्हायरसच्या संसर्गावर आत्ता या घटकेला आमच्याकडे औषध तयार आहे. ”

डॉक्टर शिझेनच्या शेवटच्या वाक्यानं सगळ्यांनाच एक दणका दिला. सगळी परिषद स्तब्ध होऊन डॉक्टरांचं बोलणं ऐकत राहिली.

“करोना व्हायरसच्या क्षेत्रात आम्ही भरपूर काम केलंय त्यामुळे माझ्याकडे यासंदर्भात तुम्हाला देण्यासारखी माहिती खूप आहे.  पण बाकी सगळं बोलण्या आधी जे औषध आज आमच्याकडे तयार आहे, जे आम्ही अगदी उद्या म्हटलं तरीही रुग्णांना देऊ शकतो, त्याच्यापासूनच बोलायला सुरुवात करतो. ” सगळ्यांची उत्सूकता शिगेला पोहोचली होती.

“तुमच्या पैकी काही जणांनी ग्रिफित्शिया बद्दल ऐकलं असेल.  ग्रिफित्शिया म्हणजे एक विशिष्ट प्रकारचं लाल शेवाळं, रेड अल्गी.  ग्रिफित्शियाच्याही बऱ्याच जाती असतात आणि त्या सगळ्या शक्यतो समुद्र तळांमध्येच मिळतात.  या ग्रिफित्शियापासून ग्रिफित्सीन नावाचं रसायन वेगळं काढता येतं.  या ग्रिफित्सीनवर आमच्या संशोधकांनी खूप काम करून त्यापासून परिणामकारक औषधीय अणू तयार करण्यात यश मिळवलंय. इतकंच नाही तर ग्रिफित्सीनच्या इन व्हिट्रो आणि इन व्हिवो अशा दोन्ही प्रकारच्या यशस्वी चाचण्या आम्ही घेतल्या आहेत.  आणि या चाचण्यांचे सर्व निकाल फक्त सकारात्मकच आहेत.  या सगळ्यांतून ग्रिफित्सीन १००% मार्कानी उत्तीर्ण झालंय.  या चाचण्यांचे सर्व बारकाव्यांसकटचे तपशील आमच्या कडे उपलब्ध आहेत आणि हे सगळे येत्या एक दोन दिवसात आम्ही जागतिक आरोग्य संघटनेकडे सुपूर्द करत आहोत. त्यांच्याकडून ते तुम्हालाही बघता येतील.” एक क्षण थोडं थांबून मनात काहीतरी आखणी करून डॉक्टर शिझेन पुन्हा बोलायला लागले.

“याचाच दुसरा अर्थ असा की आमच्याकडे आता करोना व्हायरसच्या रोगावर १००% टक्के निदान उपलब्ध आहे आणि आमच्याकडे आम्ही ते रुग्णांना द्यायला सुरुवातही केली आहे. ” एवढ्या ठाम शब्दात ही बातमी सांगितल्यामुळे सगळ्याच सदस्यांमध्ये एक समाधानाची लकेर पसरली.  कित्येक सदस्यांनी टाळ्या वाजवून डॉक्टर शिझेनांचं अभिनंदन केलं.

“पण जरा थांबा. ” डॉक्टरांच्या शब्दांनी परत एकदा परिषदेत शांतता पसरली.  ” हे यश साजरं करण्याची अजून वेळ आलेली नाही कारण, यात अजून एक समस्या आहे.  आणि ही समस्या सोडावण्यासाठी आपल्या सगळ्यांची मदत आम्हाला लागणार आहे.  डॉक्टर लक्ष्मींनी आधी सांगितल्याप्रमाणे ही एक जागतिक लढाई आहे आणि यात आपल्याला एकमेकांच्या सहकार्यानेच विजय मिळवता येईल. ” सगळे सदस्य कान देऊन ऐकत होते. “हे ग्रिफित्शिया किंवा या प्रकारचं लाल शेवाळ हे समुद्र तळावरून काढायला लागतं आणि हा सगळा उपदव्याप खूप कटकटीचा असतो.  दुसरं म्हणजे ग्रिफित्शियातून ग्रिफित्सीन निघण्याचं प्रमाण खूप कमी असतं.  त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ग्रिफित्शिया समुद्र तळातून बाहेर काढावं लागतं”.

बोलता बोलता डॉक्टर शिझेनांच्या कपाळावर घाम जमा झाला होता.

“या सगळ्या गोष्टींचा विचार करता आणि आपल्याला असलेल्या घाईचा विचार करता, चीननं यासंदर्भात एक प्रस्ताव तयार केला आहे. तो असा आहे की हिंदी महासागरात एक आणि प्रशांत महासागरात एक अशा दोन जागा चीननं शोधून काढल्या आहेत की जिथं समुद्र तळांमधून खूप मोठ्या प्रमाणात ग्रिफित्शिया मिळू शकेल आणि त्यापासून ग्रिफित्सिनचं उत्पादन आम्ही त्वरित तयार करू शकू. ” सगळी सभा अवाक होऊन ऐकत होती.

“पण समुद्रातून इतक्या मोठ्या प्रमाणात ग्रिफित्शिया काढण्यासाठी जो प्लॅटफॉर्म समुद्रात उभा करावा लागेल तो त्वरित कसा उभा करणार? ” अमेरीकेच्या डॉ मॅककार्थींनी विचारलं.

“आम्ही त्याचा विचार केलाय.  आमच्या दोन वेगवेगळ्या जहाज बांधणी कारखान्यात असे दोन प्लॅटफॉर्म तयार करण्याचं काम मागचे चार पाच महिने चालू होतं.  त्यामुळे यातला एक प्लॅटफॉर्म आमच्या कडे तयारच आहे आणि दुसरा येत्या काही आठवड्यांमध्ये तयार होईल. पहिला प्लॅटफॉर्म आमच्या सैन्य आणि नाविक दलाच्या मदतीनं आम्ही येत्या काही दिवसातच आम्ही निवडलेल्या जागेवर नेऊन त्याची उभारणी करू शकू.  अक्षरशः दोन तीन आठवड्यात आम्ही ग्रिफित्सिनचं व्यावसायिक तत्त्वावर उत्पादन चालू करू शकू.  आम्ही निवडलेल्या दोन्ही जागांचा आम्ही नीट अभ्यास केलाय आणि या जागांवर ग्रिफित्शियाचा साठा इतक्या प्रचंड प्रमाणात आहे की औषधाचा अजिबात तुटवडा पडणार नाही याची आम्हाला खात्री आहे.” सगळे सदस्य स्तिमित होऊन ऐकत होते.

“बरं मग अडचण कुठाय?  काढा ग्रिफित्शिया आणि बनवा की तुमचं औषध. ” नेदरलँडसचे डॉ पीटर्स उपरोधिक स्वरात ओरडले.

“यात अडचण अशी आहे की या दोन्ही जागा आमच्या सामुद्रधुनीत नाहीत.  म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो की संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावाप्रमाणे प्रत्येक देशाचा त्यांच्या जमिनीपासून २०० किलोमीटर्स पर्यंतच्या पाण्यावर अधिकार असतो.  ही दोन्ही ठिकाणं आमच्या २०० किलोमीटर्सच्या हद्दीत असती तर आम्ही ग्रिफित्सीनचं उत्पादन कधीच चालू केलं असतं.  परंतु या दोन्ही जागा चीनच्या हद्दीपासून बऱ्याच दूर आहेत. यातली प्रशांत महासागरातली जागा ही हवाई बेटांच्या जवळ किलौएह ज्वालामुखीपासून शंभर दीडशे किलोमीटरवर आहे.  आणि दुसरी जागा हिंदी महासागरात श्रीलंकेपासून साधारण तीनशे किलोमीटर दक्षिणेला आहे.” समुद्रशास्त्र हे संपूर्णपणे वेगळंच ज्ञान होतं त्यामुळे, वैद्यकीय क्षेत्रातल्या त्या सगळ्या संशोधकांसाठी हे सगळं अदभूतच होतं.

“संयुक्त राष्ट्रसंघाची नव्याने स्थापन झालेली एक संस्था आहे आणि त्याचं नाव आहे राष्ट्रीय सीमांपलिकडील सामुद्रीय जैवविविधता किंवा बायोडायव्हर्सिटी बियाँड नॅशनल ज्यूरिसडिक्शन.  थोडक्यात बीबीएनजे. आम्हाला हे सामुद्रीय उत्खनन करू द्यायचं की नाही हे ठरवायचा अधिकार खरं तर बीबीएनजेला आहे.  पण करोना व्हायरसच्या संसर्गामुळे बीबीएनजेची बैठक होऊ शकत नाहीये.  मागच्या मार्चमध्ये त्यांची बैठक होणार होती पण ती अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली गेलीये. आज करोनाचं संकट आपल्या अगदी गळ्यावरच बसलंय त्यामुळे आम्हाला हे उत्खनन करण्याची परवानगी अगदी तातडीनं मिळणं अत्यावश्यक आहे.”  कुठल्याच सदस्याला यावर काय बोलायचं हे कळेना.

“माझी त्यामुळे तुम्हा सगळ्या सदस्यांना अशी विनंती आहे की आपण संयुक्त राष्ट्रसंघाला गळ घालून या सामुद्रीय उत्खननासाठी विशेष परवानगी मिळवणं आवश्यक आहे.  आज परिस्थिती किती आणीबाणीची आहे हे मी आपल्याला वेगळं सांगायला नको.  बीबीएनजेच्या अनुपस्थितीत संयुक्त राष्ट्रसंघाकडूनच ही परवानगी मिळू शकते.  त्यामुळे आपण सगळ्यांनी आजच या परिषदेद्वारा एक ठराव करून संयुक्त राष्ट्रसंघाला या उत्खननासाठी परवानगी द्यायला भाग पाडूया.  संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी हे निकराचं पाउल लगेच उचलणं आवश्यक आहे असं मला वाटतं. ”

परिषदेत एक विचित्र शांतता पसरली.  परिषदेतल्या बऱ्याच सदस्यांना असा घाई घाईनं ठराव करणं पटत नव्हतं पण म्हणजे नक्की काय तेही कळत नव्हतं.

“सदस्यांपैकी कुणाला यावर काही बोलायचं असेल किंवा काही शंका विचारायची असेल तर ते डॉक्टर शिझेनांना जरूर विचारू शकता.”  डॉक्टर लक्ष्मी.

“डॉक्टर शिझेन जरा थांबा”. पुन्हा एकदा अमेरिकेच्या डॉक्टर मॅककार्थींनी बोलायला सुरुवात केली. “ही अशा प्रकारची सामुद्रीय उत्खननाला परवानगी मागणं हे वैद्यकीय संशोधकाच्या अखत्यारितलं काम नाही. आम्हाला या संबधी आमच्या राष्ट्रप्रमुखांशी, संसदेशी बोलावं लागेल. कदाचित आमच्या देशाकडून या क्षेत्रातल्या एखाद्या तज्ञाला यावर तुमच्याशी बोलायला पाठवलं जाईल. कदाचित तुम्ही आला आहात तसंच आमच्याही सैन्यातला एखादा अधिकारी माझ्या जागी येइल,” डॉ मॅककार्थींनी जाता जाता एक टोला लगावला, “परंतु तुम्ही म्हणताय तशा प्रकारच्या ठरावाबाबत मी आमच्या देशाशी बोलल्याशिवाय काहीच सांगू शकणार नाही.”

“डॉक्टर मॅककार्थी, परंतु आपण यात गैर काहीच करत नाही आहोत आणि ही आत्ताच्या घडीची निकड आहे. यात आपण कुणाचे काय अधिकार वगैरे असल्या लाल फितीच्या भानगडी आणून वेळ वाया घालवता कामा नये.” डॉक्टर शिझेननी समजावण्याचा प्रयत्न केला.

“मीही डॉक्टर मॅककार्थींशी सहमत आहे.  मलाही आमच्या पंतप्रधानांशी याबाबत चर्चा केल्याशिवाय काही मत देता येणार नाही.”  कॅनडाच्या प्रतिनिधिनं सांगितलं.

“माझंही मत तेच आहे… ” माझंही मत तेच आहे… ” तीन चार सदस्यांनी एकदमच एकावेळेला बोलायला सुरुवात केली.

“मित्रहो आपल्याकडे वेळ नाहीये. जरा विचार करा.  हा ठराव आजच्या आज होणं खूप गरजेचं आहे.” डॉक्टर शिझेन.

“अहो ही वेळ तुम्हीच आमच्यावर आणली आहेत.  आणि आज तुम्हीच आम्हाला असं कोंडीत पकडताय? ” जर्मन प्रतिनिधिनं विचारलं

बरेच सदस्य एकाच वेळेला बोलायला लागल्यामुळे कुणाचंच बोलणं कुणाला ऐकू येइना.  परिषदेत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

” कृपा करून जरा शांत रहा.”  पुन्हा एकदा डॉक्टर लक्ष्मी स्क्रीनवर आल्या.  त्यांनी बाकी सगळ्या सदस्यांच्या मायक्रोफोनचा आवाज बंद करून टाकला आणि स्वतःच बोलायला सुरुवात केली. तरीही बरेच सदस्य आपापल्या खिडकीत चिडून हातवारे करत होते.

“मी सुरूवातीलाच सांगितल्याप्रमाणे या परिषदेचा उद्देश एखाद्या देशाला आंतरराष्ट्रीय समुदायाकडून किंवा संयुक्त राष्ट्रसंघाकडून काही मदत हवी असल्यास अशी मदत मिळवून देण्यासाठी ही परिषद प्रयत्न करेल.  हे आपण आधीच ठरवलं होतं आणि त्याला अनुसरूनच चीननं ही मदत या परिषदेकडे मागितली आहे.  त्यात त्यांची काही चूक आहे असं मला वाटत नाही.  त्याच बरोबर इतर सदस्यांचं जे म्हणणं आहे की त्यांना त्यांच्या राष्ट्रप्रमुखांशी, संसदेशी बोलल्या शिवाय यावर मत व्यक्त करता येणार नाही, हेही बरोबरच आहे. याच बरोबर हेही तितकंच महत्त्वाचं आहे की आपल्याकडे फारसा वेळ नाहीये.  या सगळ्या गोष्टींचा विचार करता मला असं वाटतंय की ही परिषद आज आपण इथेच थांबवू, कारण चीनच्या प्रस्तावावर काय तो योग्य निर्णय घेतल्यानंतर मगच परिषदेचं कामकाज पुढे चालू ठेवणं ठीक राहील.”

“हा इतका महत्त्वाचा मुद्दा असाच अधांतरी ठेवून ही परिषद तशीच पुढे रेटणं मला पटत नाहीये. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना असं सुचवू इच्छिते, की पुढच्या तीन चार दिवसात आपण सर्व जण याबाबतीत आपापल्या देशातल्या महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करून आपल्या देशाचा दृष्टिकोन समजून घ्या.  मला पण हा सगळा मुद्दा आमच्या महासंचालकांच्या कानावर घालावा लागेल, तसंच आमच्या कार्यकारी समितीशीपण चर्चा करावी लागेल.  त्याचबरोबर संयुक्त राष्ट्रसंघ आणि बीबीएनजे या सगळ्यांना पण ही घडामोड कळवावी लागेल आणि त्यांची मतं लक्षात घ्यावी लागतील.  सुदैवाने सध्याच्या परिस्थितीमुळे कुणीही प्रवास करत नाहीयेत त्यामुळे या सगळ्या चर्चा करायला लोक जागेवरच सापडतील. त्यामुळे आपलं आजचं काम आपण इथेच थांबवू आणि बरोबर ५ दिवसांनंतर म्हणजे ६ जुलै २०२० ला परत याच वेळेला सकाळी इथे भेटू आणि मग या मुद्द्यावर त्या वेळेस सर्वानुमते निर्णय घेऊ. धन्यवाद.” डॉक्टर लक्ष्मीनं त्यांच्या समोरचा मायक्रोफोन बंद करून टाकला आणि स्वतःच्या केबिनकडे जाण्यासाठी त्या उठल्या.  चीनचे डॉक्टर शिझेन मात्र ही परिषद अशी पुढे ढकलली गेल्याने नाराज झालेले दिसत होते.

  • क्रमश:

मिलिंद जोशी

9930904824

cropped-blue-life-site-icon.png

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s